Pulwama Attack : पाकला धडा शिकवा!, अमेरिका-रशियासह विरोधकांचाही सरकारला पाठिंबा

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तसा ठराव पारित करण्यात आला आहे.

दिल्ली, 16 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर राजकारण न करता सर्वपक्षीयांनी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं म्हटलं आहे. या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सर्व पक्षीय सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारी हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील याबाबतचा आढावा घेतला आहे. शिवाय, रशिया, अमेरिकेनं देखील दहशतवादाविरोधातील या लढाईत आपण भारतासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्यानंतर भारतानं देखील पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याकरता आता कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

काय म्हटलं आहे ठरावामध्ये? 

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही सर्वजण कठोर शब्दात निषेध करतो. घटनेत सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती ही शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

आम्ही भारतीय सीमा भागात सुरू असलेल्या दहशतवादी घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व पावलांना पाठिंबा देतो. सीमावर्ती भागात गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी कारवाया सुरू आहेत. या कारवाईला शेजारी राष्ट्राकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे भारत या आव्हानाला सामोर जाण्याकरिता सक्षम असून प्रत्येक भारतीय या आव्हानासोबत लढण्याची एका सुरात मागणी करत आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार सैन्याच्या पाठीशी उभी आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि एकता जपण्याकरिता आम्ही सर्वजण एक आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*